Saturday, 1 December 2012

इंग्लंडमध्ये रंगली स्लाव मित्र मंडळाची सांस्कृतिक दिवाळी

पारंपरिक पदार्थांची रेलचेल, लहान मुलांसाठी खेळ, हिंदी - मराठी
गाण्यांची साथ-संगत, करमणुकीचे कार्यक्रम अशा उत्साही वातावरणात
इंग्लंडमध्ये शनिवारी (दिनांक २४ नोव्हेंबर) सांस्कृतिक दिवाळी साजरी
करण्यात आली. श्रीखंड- पुरी – मसालेभाताचे अस्सल मराठी स्नेहभोजन आणि
त्यानंतर स्त्रियांना मिळालेले मोगऱ्याचे गजरे यामुळे तर आपल्या देशातच
सण असल्याचा भास इंग्लंडवासीयांना झाला. लंडनच्या नैर्ऋत्येला असणाऱ्या
बर्कशायर परगण्यातील स्लाव मित्र मंडळातर्फे दिवाळी स्नेह मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले होते. आपल्या देशापासून, आप्तांपासून हजारो मैल दूर
असूनसुद्धा दिवाळीसारखे सण पारंपरिक उत्साहात साजरे करता यावेत यासाठी
स्लाव मित्र मंडळ गेली काही वर्षे परिसरातील भारतीय नागरिकांनी एकत्र
आणण्याचे काम करीत आहे. गेली तीन वर्षे स्लावमध्ये अशी सांस्कृतिक दिवाळी
साजरी करण्यात येत आहे.
शनिवारच्या दिवाळी स्नेहमेळाव्यात स्लाव परिसरातील अनेक भारतीय कुटुंब
सहपरिवार सहभागी झाली होती. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने झाली.
त्यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण
करण्यात आली. त्यानंतर ग्रामर स्कूलमध्ये विशेष यश मिळवणाऱ्या भारतीय
मुलांचा सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला २२५ जण उपस्थित होते. स्नेहमेळाव्यानिमित्त संगीत खुर्ची,
ऑक्शन गेमसारखे विविध करमणुकीचे खेळ झाले. स्लाव मंडळाच्या
कार्यकर्त्यांनी सहकुटुंब फन डान्सही सादर केला. लहान मुलांसाठी
बाउंन्सिंग कॅसल उभा करण्यात आला होता. डिनर अँड डान्स हा कार्यक्रमाच्या
उत्साहाचा परमोच्च बिंदू ठरला. एस. के. पानीपुरी या हॅरो येथील केटरिंग
सर्व्हिसतर्फे खास महाराष्ट्रीय जेवणाचा बेत होता. श्रीखंड पुरीपासून
कोथिंबीर वडी- मसाले भात  मठ्ठ्यापर्यंत पदार्थ ठेवण्यात आले होते.
स्लाव मित्र मंडळाचे आधिश देसाई, अजय मुरुडकर, राकेश लाड, मंदार मिराशी,
योगेश चव्हाण, निखिल देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
गेले २- ३ महिने तयारी केली.

अनुज बिडवे मेमोरिअल फंडसाठी  मदत
स्लाव मित्र मंडळातर्फे अनुज बिडवे मेमोरिअल फंडसाठी ४०१ ब्रिटीश पाऊंडचा
निधी जाहीर करण्यात आला. अनुज बिडवे या मूळच्या पुण्याच्या
विद्यार्थ्याची गेल्या वर्षी मॅंचेस्टरमध्ये हत्या झाली होती. त्याच्या
स्मरणार्थ येथील मराठी मंडळाने हा फंड गोळा करून बिडवे कुटुंबीयांना मदत
केली. तसेच यापुढच्या काळातही अशा बिकट प्रसंगी इथल्या भारतीयांना मदत
करता यावी यासाठी अनुज बिडवेच्या नावाने मेमोरिअल फंड कायम असणार आहे.
स्लावच्या दिवाळी स्नेहमेळाव्या निमित्ताने एकत्र जमलेल्या भारतीय
कुटुंबांनी या फंडसाठी थोडी रक्कम उभी केली. स्लाव मित्र मंडळाचे अजय
मुरुडकर म्हणाले की, गणपती उत्सवादरम्यानदेखील आम्ही गणपतीच्या गाण्यांची
सीडी तयार केली होती. त्या सीडी विकून मिळालेली रक्कमदेखील या मेमोरिअल
फंडला देण्यात आली. एकूण ४०१ पाउंडचा निधी या फंडसाठी देण्यात येणार
असल्याचे मुरूडकर यांनी सांगितले.

https://www.facebook.com/media/set/?set=a.10151525860843243.533221.717568242&type=1&l=aa1f882436

No comments:

Post a Comment